नागठाणे : कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने कराड उत्तरचे आमदार आ. मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली नागठाणे येथील वरद मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये १०० वर तक्रारींवर जागीच फैसला झाला. तर दिडशेवर अर्जही दाखल झाले आहेत. जनता दरबारामध्ये कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे व वर्णे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील नागरिकांच्या समस्या व प्रश्नांवर चर्चा होऊन जागेवरच सुटल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आ. मनोज घोरपडे यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ कामाला लागत मसूर, रहिमतपूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तिवर आज सातारा तालुक्यातील या दोन जि. प. गटातील समाविष्ट गावांसाठी असलेल्या जनता दरबारामध्ये एकूण २५० पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १०० वर तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आले. उरलेले दिडशेवर तक्रारी अर्ज प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आ. मनोज घोरपडे यांनी दिले आहेत.
यावेळी तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मुलाणी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ ,बोरगावचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख तसेच नागठाणे, वर्णे जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. कार्यक्रमासाठी दोन्ही गटातील तसेच सातारा तालुक्यातील अनेक आजी माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.