सातारा : अजित पवार-शिवेंद्रसिंहराजे यांच्यात बारामतीत बंद कमरा चर्चा

भेट राजकीय नसून विकासकामांसाठी झाल्याची शिवेंद्रसिंहराजे यांची स्पष्टोक्ती

सातारा (प्रतिनिधी)- सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसून मतदारसंघातील विकास कामांसाठी अजितदादांना भेटण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सातारा- जावळी मतदारसंघात ते भाजपमधून मताधिक्याने विजयी झाले होते. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची कायमच जवळीक राहिली आहे. सातारची हद्दवाढ करून या जवळीकीवर शिक्कामोर्तब झाले होते. त्यातच कास तलाव उंची वाढवणे, कण्हेर पाणी योजना, सातारा मेडिकल कॉलेजसाठी आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार अजित पवार यांनी तात्काळ भरीव निधी दिला होता. अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी, साताऱ्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिलेला निधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही दबक्या आवाजात टीका होत होती.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी (दि. 24) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी अन्य कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची अजित पवारांशी जवळीक वाढली आहे. सातारच्या पवार यांच्या दौऱ्यावेळी यापूर्वी त्यांनी भेट घेतली होती. परंतु आता ते थेट बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांना भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.

बारामतीत बंद खोलीतील अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या झालेल्या चर्चेचा तपशील मिळालेला नाही. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांविषयी चर्चेसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला आलो होतो. यापेक्षा अधिक काही नाही” अशी प्रतिक्रिया बैठकीतून बाहेर पडताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, उभयतांमध्ये बारामतीत झालेल्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.