वाई बसस्थानकाला टवाळखोरांचे ग्रहण

पोलीस म्हणतात…
-रोजचे मडे, त्याला कोण रडे
-तक्रारीशिवाय आम्ही काही करु शकत नाही

-अनिल काटे

मेणवली – वाई बसस्थानकाच्या आवारात रोजच सायंकाळी 4 ते 6 च्या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी गट एकमेकांवर जबरी हल्ले करत तुटून पडत सिनेस्टाईल राडेबाजी तसेच तुंबळ हाणामाऱ्या करत आहेत. दैनंदीन घडणाऱ्या या घटनांमुळ बस स्थानकाच्या आवारात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगारातील कर्मचाऱ्यांसह प्रवासी वर्गातही प्रचंड घबराट पसरली असून रोजच होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राडेबाजीमुळे हतबल होऊन “रोजचं मडं त्याला कोण रडं’ अशी भूमिका बजावणारे वाई पोलीस म्हणताहेत की तक्रारींशिवाय आम्ही काहीही करु शकत नाही. दरम्यान, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याआधीच दंगेखोर विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थीनी व प्रवासी वर्गातून केली जात आहे.

बघ्यांची गांधीजींच्या माकडाची भूमिका

वाई बसस्थानकात होणाऱ्या युवकांच्या हाणामाऱ्या आता रोजच्याच झाल्या आहेत. मात्र, दररोज शेकडो लोकांसमोर या घटना घडत असताना बघ्यांकडून मात्र गांधीजींच्या माकडांची भूमिका बजावली जात आहे. कुणीही व्यक्ती याबाबत पोलिसात तक्रार अथवा माहिती देत नसल्यानेही खेद व्यक्त केला जात आहे.

शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळी म्हणजेच साधारणत: सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान वाई बसस्थानकात विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी वाई शहरातील तसेच परिसरात असणाऱ्या ठराविक मोठ्या गावांमधील टवाळखोर युवकांकडून मुलींना अपशब्द वापरणे, अश्‍लील भाषेत संभाषण करणे, मुलींचा पाठलाग करणे असे प्रकार सुरु असतात. या प्रकारांमधून गावागावांमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत.

भांडणाची कारणे अतिशय शुल्लक असली तरी मुलींची छेडछाड या मुख्य कारणातून आगार परिसरात रोज जबरी हाणामाऱ्या होत आहेत. 18 ते 25 वयोगटातील शंभराहून अधिक युवकांचे टोळके एकट्या युवकावर तुटून पडत आहे. युवकाचा पाठलाग करत सिनेस्टाईल पद्धतीने अक्षरशः हॉकी स्टिक, लाथाबुक्‍क्‍यांनी युवकाला बेदम चोप देवून जीवघेणा हल्ला चढवला जात आहे. या हल्ल्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी पुनःश्‍च अनुभवायला मिळत आहे.

“काशीनाथाचं चांगभलं’

वाई बसस्थानकात “काशीनाथाच चांगभलं’ अशी गर्जना करत होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यात एखाद्या युवकाच्या आयुष्याची खरोखरच “काशी’ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच या परिसरात विळे-कोयते विकणाऱ्या महिला कायम फिरत असतात हे पाहता सध्या दगड धोंडे व काठीने होणाऱ्या मारामारीत विळ्या-कोयत्याचा रागापोटी कधीही वापर होवू शकतो, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे. तर भिरकावलेले दगड-धोंडे कोणाच्या डोक्‍याचा नेम घेतील याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

मार खाल्लेल्या जखमी युवकाची टोळी अचानक येवून प्रति हल्ला करत वाई आगार परिसरात एकच खळबळ उडवून देत दहशत निर्माण करत आहेत. शंभर दोनशे युवकांची टोळी अचानक एकमेकावर हल्ले करत वाई आगाराच्या संपूर्ण आवारात सैरावैरा पळत असल्याने घरी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशी महिला व वयोवृद्ध नागरिकांची व मुलींची भीतीपोटी जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना चांगलीच तारांबळ उडत आहे.

दैनंदीन घडणाऱ्या या घटनांमध्ये वाईचा अक्षरश: बिहार झाल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त होऊ लागल्या असून पोलिसांच्या नावाने बोटे मोडली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)