सातारा : सासवड, ता. फलटण येथील दहा वर्षीय शंभूराज संतोष राऊत या अकरा वर्षीय मुलावर फलटण येथील डॉ. युवराज कोकरे यांनी चुकीचे ऑपरेशन केले. त्यामुळे मुलाचा उजवा पाय गुडघ्यातून खाली कापावा लागला. संबंधित मुलाचे भविष्य असुरक्षित झाले असून डॉ. कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुलाचे वडील संतोष दत्तात्रय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली असून पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, शंभूराज हा पसरणी घाटामध्ये झालेला अपघातात जखमी झाला होता. त्यावेळी फलटण येथील डॉ. युवराज कोकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्यावेळी त्याचे ऑपरेशन करून त्याच्या पायाला प्लास्टर घातले आणि फिक्सर बसवला हे उपचार करूनही त्याच्या पायाला फरक पडला नाही. फिक्सर काढल्यानंतर त्याचा पाय सुजलेला दिसून आला तेव्हा डॉक्टरांनी त्याला वेदनाशामक इंजेक्शन दिले. पायाची सूज उतरेना म्हणून अधिक उपचारासाठी त्याला पुण्यात दाखल करण्यात आले तेव्हा तेथील डॉक्टरांनी शंभूराचा पाय कापावा लागेल, अशी धक्कादायक माहिती दिली.
कोकरे यांनी तब्बल सात आठवडे फिक्सर ठेवला. कोकरे यांच्या सांगण्यानुसार हाड जोडले होते. मात्र ते एक्स-रे मध्ये का दिसले नाही. डॉ. कोकरे यांनी पुण्याला पेशंट रेफर करताना दुसऱ्या हॉस्पिटलचे नाव दिले. शंभुराज यांच्या भवितव्याचे चुकीचे ऑपरेशनमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. कोकरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि आमच्या मुलाला न्याय मिळावा.