सातारा : मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून सुरक्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीकरणासाठी माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांचे सामाजिक दायित्व उपक्रमातील (सीएसआर) भागीदार असलेल्या जीविका फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. असा करार करणारा सातारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
एमडीएल आणि जीविका फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे 2,800 शालेय मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळाले आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत गडचिरोली, सातारा, रायगड आणि मुंबई या चार जिल्ह्यांतील शाळांचा समावेश करण्यात आला. यासाठी 50 हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचारी कार्यरत होते, ज्यामुळे लसीकरण प्रक्रिया यशस्वी आणि सुकर झाली. जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मिशन तेजस्विनी उपक्रमांतर्गत राबवला जात आहे.
लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी म्हणून 50 हून अधिक शाळांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबवले गेले. यात 1000 हून अधिक शिक्षक, 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि तितक्याच संख्येने पालकांना गर्भाशयाचे आरोग्य, लवकर तपासणी आणि प्रतिबंध याविषयी माहिती देण्यात आली.जीविका फाउंडेशनने पालकांची लेखी संमती घेऊनच विद्यार्थिनींना लस दिली. मिशन तेजस्विनी हा महिलांच्या आरोग्यासाठी आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
कर्करोगमुक्त सातारा घडवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी एमडीएलकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले. माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे सामाजिक दायित्व उपक्रम विभागाचे प्रमुख अमित नबीरा म्हणाले, “एमडीएल केवळ भारताच्या सागरी क्षेत्राची ताकद वाढवत नाही, तर समाजावरही सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे.
” जीविका फाउंडेशनचे संस्थापक संचालक जिग्नेश पटेल म्हणाले, “प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा काळाची गरज आहे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वेळेवर लस घेतल्यास टाळता येऊ शकणारा आजार आहे.’’ प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि समुपदेशकांचा प्रत्यक्ष सहभाग या मोहिमेमध्ये होता. सुसज्ज कोल्ड चेन लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून अंतिम टप्प्यापर्यंत दुर्गम भागांमध्ये देखील सुरक्षितपणे लसी पोहोचवण्यात आल्या.