सातारा – सातारा बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. रस्ता चुकलेल्या बालकांना त्यांचे पालक तातडीने मिळाले आहेत. ही चौकी जिल्ह्यात “रोल मॉडेल’ म्हणून लौकिकास पात्र ठरेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व्यक्त करून जिल्ह्यात या चौकीचे मॉडेल उभा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी कराड शहर, बोरगाव, वाई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला सहमती दाखवली आहे. सातपुते यांनी गुरुवारी सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीची पाहणी केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक अधीक्षक समीर शेख, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सातपुते यांनी चौकीची आणि कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून चौकीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर शुक्रवारी शिवतेज सभागृहात झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत त्यांनी बसस्थानक चौकीतील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून सर्वांचा सन्मान केला. तसेच जिल्ह्यात या चौकीचे “रोल मॉडेल’ उभे करण्यासाठी त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यावेळी वाईचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव
खोबरे, बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक्या बसस्थानक चौकीच्या धर्तीवर बनवण्यास तयार दाखवली.