सातारा : सुधारित बांधकाम परवाना देण्याकरिता दहा लाख रुपयांची लाच घेताना कराड नगरपालिकेचा कनिष्ठ लिपिक तौफिक कय्यूम शेख (वय 44), सहायक नगर रचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (वय 32, रा. देसाईनगर, कराड) तसेच खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांच्या विरोधात कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच मुख्याधिकारीपदावरुन कार्यमुक्त होऊनही मागील तारखेने बांधकाम परवान्याचे चलन स्वाक्षरी करून दिल्याने कराड नगरपालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारे अडचणीत आले असून त्यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी हा सापळा रचला होता. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी कराड शहरातील 79, सोमवार पेठ येथे पार्किंग आणि पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित केले होते. परवानगी 2017 मध्ये घेण्यात आली होती. या कामाला काही कारणास्तव 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, काही कारणास्तव काम सुरू न झाल्याने पुन्हा परवानगी मिळण्याबाबत 2023 मध्ये त्यांनी अर्ज दाखल केला होता.
या परवानगीकरता तक्रारदारांनी सहाय्यक नगररचनाकार आनंद शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी खासगी व्यक्ती देव याच्यासमक्ष तक्रारदारांना भेटून दोन हजार स्क्वेअर फूट वाढीव बांधकामाचे बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाज 80 लाख रुपये होते. पैकी दहा ते बारा टक्के म्हणजे दहा लाख रुपये रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. या रकमेचा पहिला हप्ता पाच लाख रुपये स्वीकारताना संशयित लोकसेवक तौफिक शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवक मुख्याधिकारी शंकर खंदारे कराड नगरपरिषदेत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरुन ते 23 मार्च 2025 रोजी कार्यमुक्त झाले.
शिरगुप्पे आणि शेख यांच्या मदतीने बांधकाम परवाना करताना आवश्यक असलेले चलन त्यांच्या व्हॉट्स ॲपवरून खंदारे यांनी स्वतःच्या मोबाइल क्रमांकावर घेतले आणि मागील तारखेच्या चलनावर सह्या करून शिरगुप्पे यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठवले. या प्रकरणामध्ये शंकर खंदारे यांचे प्रयत्न लाच प्रकरणाला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले. म्हणजेच मागील तारखेने चलन तयार करण्याचे काम संगनमताने सर्व संशयितांनी केले. त्यामुळे या प्रकरणामध्ये चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कराड पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.