सातारा – कसबे बामणोली (ता. जावळी) निवासी शासकीय आश्रमशाळेत शिकलेला श्रेयस ठकाराम शिंदे (रा. जळकेवाडी ता.सातारा) हा विद्यार्थी चार्टड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग ठाणे प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत सुरू असलेल्या या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेने गेल्या 50 वर्षात सातारा, जावळी, पाटण,महाबळेश्वर या प्रमुख तालुक्यांसह विविध तालुक्यांतील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत चांगले नागरिक बनविले आहे. अनेक विद्यार्थी अधिकारी बनले आहेत.
कास पुष्प पठारानजीक वजराई धबधब्याच्या पुढच्या बाजूला डोंगरदऱ्यात जळकेवाडी गाव आहे. या गावात पूर्वीपासून आजवर शाळा नाही. मात्र, श्रेयसचे आई वडील मनाबाई व ठकाराम शिंदे निरक्षर असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला वयाच्या पाचव्या वर्षी बामणोलीच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी पाठवले.
दहावीपर्यंत श्रेयसने या शाळेत शिक्षण घेतले. मुंबईच्या महाराष्ट्र नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे दिवसा काम आणि रात्री कॉलेज करून त्याने शिक्षण घेतले. पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर सीए पदवी प्राप्त केली. बामणोली ग्रामपंचायतीने त्याचे अभिनंदन केले.
“आई- वडीलांचा आशीर्वाद असल्याने भावाच्या मार्गदर्शनाखाली क्लासच्या फीसह खर्चाची सर्व जबाबदारी भावाने उचलल्यानेच हे यश संपादन करता आले. आपण ज्या क्षेत्रात निश्चयाने ऊडी घेतो त्याचा शेवट हा नक्की गोडच असतो. अपयशाने खचून न जाता जिद्दीने त्या गोष्टींच्या शेवटापर्यंत गेल्यास यश नक्की मिळते.”
श्रेयस शिंदे