सातारा : अतुल पवारसह सात जणांवर खाजगी सावकारीचा गुन्हा

व्याजाच्या पैशासाठी हडपली जमीन; पवारवर गुन्ह्यांची मालिका सुरुच

वडूज – नागाचे कुमठे (ता. खटाव) येथील एका दलित कुटुंबातील अनंत शिवराम शिखरे यांना व्याजाने दिलेल्या पैशापोटी, त्यांची पावणेदोन एकर जमीन हडपली आणि कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी वडूज येथील कथित मानवाधिकार कार्यकर्ता अतुल बापुराव पवार (रा. उंबर्डे, ता. खटाव) याच्यासह सात जणांवर खासगी सावकारी व ऍट्रॉसिटीचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. खासगी सावकारी, दरोडा, खंडणी यासारख्या पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये अतुल हा सध्या कारागृहात असल्याने अनंत शिखरे यांनी तक्रार नोंदवण्याचे धाडस दाखवल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अनंत शिखरे यांचा मुलगा अनिल शिखरे याचे वडूज येथे वैभवलक्ष्मी लेदर हाऊस नावान बूट व चप्पल विक्रीचे दुकान होते. धंद्यात वाढ करण्यासाठी व व्यापाऱ्यांची देणी भागवण्यासाठी, त्याने 23 सप्टेंबर 2012 रोजी अतुल पवारकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. पवारने शिखरे यांच्याकडून एका बॅंकेचे कोरे धनादेश सुरक्षा म्हणून घेतले होते, तरीही त्याने शिखरे यांच्याकडून जबरदस्तीने इसार पावतीची नोटरी करून घेतली. त्यानंतर शिखरे यांनी अतुलला वेळोवेळी व्याजाची रक्कम दिली होती; परंतु पवार हा 16 जानेवारी 2013 रोजी शिखरे यांच्याकडे गेला.

आणखी सुरक्षा म्हणून जमिनीची इसार पावती करून त्याने मागितली. त्यास शिखरे यांनी विरोध केल्यावर, आताच्या आता पैसे परत द्यायचे, असे म्हणत कुमठे येथील गट नं. 264 मधील शिखरे यांच्या मालकीची एक एकर 34 गुंठे जमीन लिहून देण्यासाठी तगादा लावला होता. अनंत शिखरे व त्यांचा मुलाने अतुल आणि त्याच्यासोबत आलेल्या चार-पाच जणांना विनवण्या केल्यानंतरही पवारने जमिनीचा कागद लिहून घेतला. त्यानंतर 30 एप्रिल 2014 पर्यंत शिखरे यांच्याकडून नियमित व्याज घेतले. व्यावसायिक अडचणींमुळे अनिलचे दुकान बंद पडल्याने अनंत शिखरे हे पवारला व्याजाची रक्कम देऊ शकले नाहीत.

त्यानंतर पवार व त्याच्या टोळीने शिखरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला जबरदस्तीने एका गाडीत बसवून नेले आणि रात्री उशिरा घरी सोडले. घरी आल्यावर अनिलने घडला प्रकार सांगितला. जमिनीचा दस्त करून देण्यासाठी अतुलने मारहाण केली. पैसे परत द्यायची ऐपत नाही, तर घेता कशाला, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली, असे त्याने सांगितले. त्यानंतर अतुलने जमिनीचा दस्त करून घेत, ती जमीन हडप केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पवारच्या भीतीमुळे शिखरे कुटुंब गाव सोडून दुसरीकडे राहायला गेले होते.

त्यानंतर शिखरे हे सप्टेंबर 2020 मध्ये वडूज येथे पंचायत समितीसमोर पवारला भेटले. त्यांनी विनवण्या करून त्याला जमिनीबाबत विचारले असता, अजून एक लाख रुपये राहिल्याचे सांगितले. हे पैसे द्या अन्यथा मुलाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी अतुलने दिली. मुलाच्या जिवाचे बरेवाईट होऊ नये, म्हणून अनंत शिखरे यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत सांगितली. त्यानंतर अखेर गुन्हा नोंदवण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.