सातारा : प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) परीक्षा रविवारी (दि. २३) राज्यात होणार आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्यापुढील ज्येष्ठांना मिळाली आहे.
उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, केंद्र शासनाकडून वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात ही परीक्षा होते. उल्लास ॲपवर वर्षभर असाक्षर व स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणी सुरू असते. असाक्षरांची नोंदणी झाली आहे त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांना त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायची आहे.
गेल्या वर्षीच्या १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेस राज्यातून ४ लाख ५९ हजार प्रौढ असाक्षर प्रविष्ट झाले. त्यापैकी ४ लाख २५ हजार उत्तीर्ण झाले. ही लेखी परीक्षा १५० गुणांची असून वाचन ५०, लेखन ५० व संख्याज्ञान ५० अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात १६.५ व एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत. या शैक्षणिक वर्षात ५ लाख ७७ हजार असाक्षरांच्या नोंदणीचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १९ मार्चअखेर ५ लाख ६४ हजार ७५१ नोंदणी झाली आहे. त्यात १ लाख ६१ हजार ४६१ पुरुष तर ४ लाख ३ हजार ११७ स्त्रिया आणि ७३ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले, तसेच गेल्या वर्षीचे अनुत्तीर्ण आणि या वर्षातील नोंदणी झालेले असे सुमारे ८ लाख ४ हजार असाक्षर परीक्षेस बसविण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.
असाक्षरांना शिकवण्यासाठी १ लाख ३३ हजार १४२ स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्तपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळांवरही उल्लास कार्यक्रमाची जबाबदारी सोपवल्याने या कार्यक्रमास गती मिळत आहे. योजना शिक्षण संचालनालयाने या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय परीक्षा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील परीक्षेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.
कोल्हापूर विभागात ८७ हजार ८८२ उद्दिष्ट्य
कोल्हापूर विभागांतर्गत सातारा २३,२५२, सांगली १७,७८०, कोल्हापूर २९,६८०,रत्नागिरी १०,५७४ आणि सिंधुदुर्ग ६,५९६ अशा एकूण ८७,८८२ असाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट आहे. कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी विभागातील जिल्ह्यांसाठी ऑनलाइन बैठक घेऊन संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यस्तरावरून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सूचित केले आहे.
शाळांमार्फत उल्लास ॲपवर असाक्षर व स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणी आणि जोडणी सुरू आहे. नोंदणी व जोडणी केलेली नाही त्यांनी तातडीने करावी. परीक्षेचा सराव करावा.
– राजेश क्षीरसागर (राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ)