Satara accident : बोगदा परिसरातून डबेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात करण संग्राम देवकुळे (वय २१, रा. अरे दरे, ता. सातारा) दुचाकीस्वाराचा भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बोगदा ते परळी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डबेवाडीकडून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटी बसच्या उजव्या बाजूने दुचाकीवरुन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने देवकुळे याच्या गाडीला दणका दिला. करण देवकुळे याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट एसटी बसखाली आला. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचल्याने घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून बोगदा ते परळी मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. जखमी अवस्थेत करण देवकुळे याला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती. तालुका पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे देवकुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Ganesh Bidkar : विधान परिषदेची जागा भाजपला द्यावी; गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी