सातारा : आ. शिवेंद्रराजेंनी दिशाभूल करण्याचे उद्योग बंद करावेत

दीपक पवार; जावळी तालुका राष्ट्रवादीच्याच विचारांचा असल्याचा दावा

सातारा  – ग्रामपंचायत निवडणुकीत 75 पैकी 56 ग्रामपंचायतींवर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलेला दावा हा खोटा आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे त्यांनी आता उद्योग बंद करावेत, असा इशारा जावळीतील राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आमचा वाटा असून संपूर्ण तालुका आजही राष्ट्रवादीच्या विचारांचा असून खोटे श्रेय त्यांनी घेवू नये असेही पवार म्हणाले.

जावळी तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचा दावा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर दीपक पवार म्हणाले, मुळात ग्रामपंचायतीच्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या ठिकाणी पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्या. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले असून त्यात आम्हाला यश आल्याने 75 पैकी 38 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 37 ग्रामपंचातींसाठी मतदान झाले असून बहुतांश ठिकाणी एक, दोन, तीन अशा जागांसाठीच मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आ. शिवेंद्रराजेंचा 56 ग्रामपंचायतींवरील दावा म्हणजे त्यांचा गैरसमज आहे, असा टोला दीपक पवार यांनी लगावला आहे.

जावळी तालुक्‍यातील धनकवडी, मालचौंडी, निझरे, मोरावळे, काळोशी, बेलावडे, आरडे, खर्शी, रायगाव, महामुलकरवाडी, दरेखुर्द, सरताळे, दरे बुद्रुक, सलपाने, नरफदेव, सर्जापूर आदी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या विचाराचे सदस्य निवडून आले आहेत. काटवली, दापवडी, बेलोशी, वहागाव, आखेगणी, महू, पिंपळी, रांजणी, हातेघर, आंबेघर आदी राष्ट्रवादीच्या विचारांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. हुमगाव ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यापासून आ. शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र सर्वच ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा करुन जनतेची दिशाभूल आ. शिवेंद्रराजे करत असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला आहे.

गेली कित्येक वर्षे आम्ही राजकारणात आहोत मात्र चुकीच्या कामांचे श्रेय आम्ही कधी घेतले नाही. जावळी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या विचारांच्या असतानाही आपले अपयश झाकण्यासाठी आ. शिवेंद्रराजे वर्चस्वाचा चुकीचा दावा करत आहेत.

कास तलाव, मेडिकल कॉलेजचे श्रेय राष्ट्रवादीचेच
आ. शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीत असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटत होते. त्याचप्रमाणे आत्ता ते भाजपात असले तरी निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत आहेत. कास तलाव, मेडिकल कॉलेज, कण्हेर पाणी योजना या कामांना अजितदादांनी निधी मंजूर केल्यानंतर आ. शिवेंद्रराजे यांनी त्याचे श्रेय घेवू नये. असे खोटे श्रेय ते घेत असल्याबाबत आम्ही ना. अजित पवार यांना भेटून आमच्या व्यथा मांडल्या आहेत. अजितदादांनी हा निधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिला असून त्याचे श्रेय राष्ट्रवादीचेच असल्याचे आम्हास सांगितले आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे यांनी या कामांचे श्रेय घेवू नये, असेही दीपक पवार म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.