सातारा – कास रस्त्यावर गणेश खिंड येथे साडेसातशे फूट दरीत पडलेल्या कनिष्क जांगळे (रा. समर्थमंदीर परिसर, मंगळवार पेठ) या युवकाला आमदार शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यु टिमच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमी कनिष्कला उपचारासाठी सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कनिष्क काल दुपारी दिडच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईक व मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशीरापर्यंत तो सापडले नाही. त्यानंतर नातेवाईक शुक्रवारी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले होते.
दोन दिवसांच्या शोधानंतर तो सापडला नव्हता. त्यानंतरही मित्र व नातेवाइकांनी पुन्हा शोधाशोध केली. त्याचा भाऊ व एक युवक कनिष्कची शोधाशोध करत सातारा – कास रस्त्यावर गेले होते. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास गणेश खिंड परिसरात कनिष्कची दुचाकी आढळून आली. त्यानंतर तो दरीत पडलाल्याची शंका आल्याने दरीमध्ये शोधाला सुरवात झाली.
या वेळी कनिष्क दरीत पडलेला दिसला. त्याला काढण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. परंतु, तेही दरीत घसरले. त्यामुळे त्यांनाही किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी वर येऊन इतर लोकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कनिष्कला बाहेर काढण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टिमला बोलावण्यात आले. या टिममधील सदस्यांनी क्रेनच्या वायरच्या सहायाने दरीत उतरून सुमारे साडेसातशे फुटावरून कनिष्कला बाहेर काढले. त्याची प्रकृती गंभिर आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.