सातारा – छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला त्यातूनच रयतेचे राज्य निर्माण झाले भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या लोकशाहीमध्ये सर्वधर्मसमभावाची बीजे दिसतात. मात्र, छत्रपती शिवरायांच्या तत्कालीन साहित्यावरून वारंवार विनाकारण वाद निर्माण केला जातो, कृपया हे थांबवावे. छत्रपती शिवरायांचे अधिकृत शिवचरित्र राज्य शासनाने प्रकाशित करून त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे उभे करण्यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आग्रहीची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
शिवकाळातील ऐतिहासिक वाघनखांचे अनावरण आणि छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात आणली गेली त्याबद्दल राज्य शासनाचे खरोखर अभिनंदन आहे ही वाघनखे साताऱ्याच्या शिवाजी संग्रहालयात ठेवली जात आहेत, हा सातारकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हेच भारतीय लोकशाहीचे मूळ बीज आहे. मात्र, छत्रपती शिवरायांच्या साहित्यावरून वारंवार वाद निर्माण केला जाणे हे चुकीचे आहे . छत्रपतींनी स्वराज्य उभारणीमध्ये मोठे योगदान दिले त्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा ऐतिहासिक आढावा घेऊन त्यांचे अधिकृत शिवचरित्र प्रकाशित केले जावे आणि भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभे केले जावे, याकामी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
शिवेंद्रसिंहराजेकडून राज्य शासनाचे अभिनंदन
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा राज्य शासनाचे अभिनंदन केले. ऐतिहासिक वाघनखांचे दर्शन साताऱ्यातील शिवाजी संग्रहालयामध्ये होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. यासाठी राज्य शासनाचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे असे ते म्हणाले. छत्रपती शिवरायांची वाघनखे हा त्यांच्या शौर्याचा अभिमान आणि प्रतीक आहेत. या वाघनखांचे सातारकरांनी अवश्य दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.