सातारा : पाइपलाइन फोडून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

लोणंद – हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पाइपलाइन फोडून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न करणारी आंतरराज्य टोळी लोणंद पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे.

एचपी कंपनीची जमिनीखालून गेलेल्या पाइपलाइनला भोक पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न झाला होता. सासवड, ता. फलटण गावच्या हद्दीतील ज्वारीच्या शेतात सुमारे दोन हजार लिटर पेट्रोल पसरल्याने आणि जमिनीत मुरलेले पेट्रोल परिसरातील विहिरीत उतरल्याचे 23 मार्च रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास निदर्शनास आले होते. पेट्रोलमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. बाजारभावानुसार एक लाख 90 हजार रुपयांचे पेट्रोल वाया गेल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले होते.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी लोणंदचे सपोनि विशाल वायकर यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. सपोनि वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आंतरराज्य टोळीचा शोध घेतला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा क्र. दोनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सात सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड परिसरातून शिताफीने पकडले.

अनित हरिशंकर पाठक (वय 32, मूळ रा. पिंडराई पटखान, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), बाळू अण्णा चौगुले (वय 42, रा. रामनगर, चिंचवड, मोतिराम शंकर पवार (वय 20, रा. गवळी माथा, भोसरी, पुणे), इस्माइल पीरमहम्मद शेख (वय 62, रा.डी मार्टशेजारी पिंपरी, पुणे), शाम शिवाजी कानडी (वय 50, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (वय 41, रा. सासवड, ता. फलटण) व नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 28, रा. दालवडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संशयितांना दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवायचा आदेश फलटणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत. विशाल वायकर, गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत शिकीलकर, महेंद्र सपकाळ, संजय जाधव, अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत गार्डे, शिवाजी सावंत, विजय शिंदे यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.