सातारा: पांगारेत धरणालगत झाले बछडा व मादी बिबट्याचे दर्शन

सातारा – पांगारे, ता. सातारा येथे धरणालगत एका बछड्यासह बिबट्याच्या मादीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने सापळा लावून बछडा व मादीला पकडावे. त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या अधिवासात सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

ठोसेघर पठार नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याने बिबटे, रानगवे, अस्वल, भेकर, ससा, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.

परळी भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक शेळी ठार केली होती. ही घटना ताजी असतानाच, पांगारे, ता. सातारा येथील धरणालगत दोन दिवसांपूर्वी एका बछड्यासह बिबट्याची मादी विष्णू पवार यांना दिसली. मादी बिबट्या व बछडा पाणी पिऊन घनदाट जंगलात निघून गेल्याचे पवार यांनी पाहिले.

त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. या मादीचा वावर असलेल्या परिसरात वन विभागाने सापळा लावावा. त्यात बछड्यासह मादीला पकडून त्यांच्या अधिवासात सोडावे, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.