सातारा: वाठार येथे उभारणार 70 खाटांचे कोविड केअर सेंटर

कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्‍यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांची सोय व्हावी, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन बेड वाढविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून वाठार येथील कृष्णा फौंडेशनच्या आवारातही 70 बेडस्‌चे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू असून कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास 500 रुग्णांची सोय होणार आहे.

जिल्ह्यातील करोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने सुरुवातीपासूनच मोठे योगदान दिले आहे. सुरुवातीला 60 बेडस्‌चा कोविड कक्ष तयार करण्यात आला; पण जिल्ह्यात जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली तसतशी बेडस्‌ची संख्या वाढवत ती 400 करण्यात आली आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 1295 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून ते करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, करोना रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांना ऑक्‍सिजन देण्याची वाढती गरज लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलमधील ऑक्‍सिजन बेडस्‌ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सुरू केलेली “कोविड-19′ ओपीडी पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे. तेथे करोनाबाधित रुग्णांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ऑक्‍सिजनची गरज असलेले रुग्ण. लक्षणे नसलेले बाधित रुग्ण, ज्यांच्यावर घरीच उपचार करणे शक्‍य होईल, असे वर्गीकरण करून त्यांच्यावर योग्य उपचार तातडीने करण्यात येणार आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडल्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी “पोस्ट कोविड 19′ ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

वाठार येथील कृष्णा फौंडेशनच्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले 70 बेडस्‌चे कोविड केअर सेंटर कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करणे शक्‍य होणार आहे.
– डॉ. सुरेश भोसले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.