510 पैकी 245 बेड्स सध्या उपलब्ध : पालिकेची जवळपास सर्वच रुग्णालये फुल्ल
पुणे – करोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील बेडही फुल्ल होऊ लागले आहेत. असे असताना, ससून सर्वोपचार रुग्णालयाने पूर्ण क्षमतेने अद्यापही बेड उपलब्ध केले नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयाने मागील करोना उद्रेकावेळी सुमारे 510 बेड उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता जिल्ह्यामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी बेड वाढवणे आवश्यक बनले आहे. वाढत्या बाधितांच्या उपचाराची सोय करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या लायगुडे, डॉ. नायडू या रुग्णालयांची क्षमता संपली असून, दळवी रुग्णालयात केवळ 30-40 बेड शिल्लक आहेत.
शिवाजीनगर-सीओईपीच्या ग्राऊंडवर असलेले जंबो कोविड सेंटर सुरू होण्याला आणखी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व मदार ही ससून रुग्णालयावर आहे. नव्या 11 मजली इमारतीत सुमारे साडेसातशे रुग्णांवर उपचार घेण्याची सोय आहे. मात्र, त्यातील 245 बेड्स सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सोमवारपर्यंत ससूनमध्ये 191 बेड्स होते. मात्र, बुधवारपर्यंत 245 बेड्स उपलब्ध करून दिले. टप्प्याटप्प्याने सर्व बेड्स उपलब्ध होतील. इन्फ्रास्ट्रक्चर तयार असले, तरी ते चालवण्यासाठी मनुष्यबळ आता उपलब्ध नाही. त्यासाठी “इ निविदा’ गुरूवारी प्रसिद्ध होतील. त्यामध्ये डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियन्स, चतुर्थश्रेणी कर्मचारी, लॅब असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पॅरामेडिकल ऑपरेटर, ओटी टेक्निशियन हे सगळे मिळून सुमारे 1,125 पदांची ही जाहिरात आहे. सध्या करोना रुग्णांसाठी दोन वॉर्ड सुरू केले आहेत. एवढ्या वेगाने मनुष्यबळ मिळवून अन्य बेड्स सुरू करता येणार नाहीत. राज्याकडून सगळ्या परवानग्या घेऊन येत्या सात दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.