दुष्काळी स्थितीतही घेतले भरघोस पीक; प्रति कॅरेटला पाच हजार रुपये भाव
सासवड – आजकाल शेती व्यवसाय म्हटले की याकडे नकारात्मक नजरेने पाहिले जाते. निसर्गाचा लहरीपणा, पाणीटंचाई, भीषण दुष्काळ, शासकीय उदासीनता अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत सासवड येथील एका शेतकऱ्याच्या टोमॅटोच्या प्रति कॅरेटला पाच हजार रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. पहिल्याच तोड्यात त्यांना 1 लाख 50 रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
भरत महादेव जगताप यांची सासवड येथील इनाम मळ्यांमध्ये वडिलोपार्जित शेती असून त्यांनी अडीच एकर क्षेत्रात टोमॅटो पिकाची लागवड केली होती. जगताप यांनी याकरिता 1086 नामधारी सीडस या वाणाची निवड केली होती. टोमॅटो लागवड करताना त्यांनी मे 2019मध्ये दोन फुटांवर एक रोप अशा अंतरावरती बेड शेड या प्रकारात रोपांची लागवड केली होती. दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणून भीषण उन्हाळ्यात टोमॅटो पिकाचे जतन केले. ठिबकसाठी त्यांना जवळपास 80 हजार रूपये इतका खर्च आला आहे.
जगताप यांचे चंद्रकांत व सूर्यकांत ही दोन्ही मुले देखील आपल्या या वडिलोपार्जित शेतीमध्ये कष्ट करून पिके घेतात. जगताप यांना टोमॅटोच्या या पिकाकरिता एकूण साडेचार ते पाच लाख रुपये खर्च आला असून 85 दिवसानंतर टोमॅटो पिकाची पहिली तोडणी करण्यात आली. 1 लाख 50 रुपयांचे भरघोस उत्पन्न पहिल्याच तोड्यात त्यांना मिळाले आहे. दर चौथ्या दिवशी अशा प्रकारे तोडणी केली जाणार असून एकुण दीड महिने तोडणी केली जाणार आहे. जर अशाच पद्धतीने भाव मिळाल्यास तब्बल 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.
तब्बल वीस वर्षांपासून वडिलोपार्जित शेती कसत आलो आहे. मात्र, आजतागायत कोणत्याही पिकात फायदा मिळाला नाही. मात्र, आज टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत आहे.
– चंद्रकांत जगताप, टोमॅटो उत्पादक शेतकरी