ठिकठिकाणी कचऱ्याचा, हजारो प्लॅस्टिक बाटल्यांचा खच
सासावड- सासवडचे एसटी आगार हे सध्या अस्वच्छतेचे आगार बनले आहे. सासवड आगारातील आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोरच असलेली कचरा कुंडी तब्बल सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कचऱ्याने काठोकाठ भरलेल्या स्थितीत असून, कचराकुंडीच्या बाजूला तर पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा खचच पडलेला आहे. अशा बाटल्यांचा खच आगारात तीन-चार ठिकाणी पडलेला आहे आणि यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली असुनही याकडे सासवडच्या एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सासवडचे एसटी आगारात मध्यंतरी तब्बल दोन वर्षे सासवड बसस्थानकात महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची सोयच नव्हती. दैनिक “प्रभात’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे संत सोपानकाका बॅंकेने महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आणि महिला प्रवाशांची कुचंबणा थांबली होती. आचारसंहिता लागू होण्याआधी घाईघाईने बसस्थानकाचा उद्घाटन समारंभ थाटामाटात उरकण्यात आला. मात्र, पुरुषांचे स्वच्छतागृह तुंबलेल्या स्थितीत असून, बसस्थानकावर प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असुनही आगार व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- आगार व्यवस्थापकांच्या बदलीचा संगीत खुर्चीचा खेळ
सासवड आगारास आलेले सगळेच अधिकारी हे प्रभारीच असतात. परिणामी त्यांचे सासवड आगारातील कारभारावर दुर्लक्षच होत आहे. सासवडला कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार? यापुर्वी पी. व्ही. पाटील, भुताळे आणि आताच्या सासवडच्या आगार व्यवस्थापक मनिषा इनामके या प्रभारीच आहेत. पुरंदर तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या सासवड आगारास एसटी महामंडळाने कायम स्वरुपी अधिकारी नेमावा अशीच शेकडो प्रवाशांची मागणी आहे. - सासवड नगरपालिकेला या बाबतीत तीन दिवसांपूर्वीच पत्र दिले असून मुख्याधिकाऱ्यांना फोनही केलेला आहे.
-मनिषा इनामके-गायकवाड, प्रभारी आगार व्यवस्थापक, सासवड - सासवड एसटी आगाराच्या आगारव्यस्थापक यांच्याकडून वेळत आगारातील कच-या बाबतीत फोन करणे आवश्यक आहे. आगारातील कचराकुंडी ओथंबून वाहत आहे तरीदेखील आगार व्यवस्थापक फोन करीत नाहीतण आगारात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. वास्तविक पाहता आगारातील कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था एसटी महामंडळानेच करणे गरजेचे आहे. सर्व जबाबदारी सासवड नगरपालिकेकडे ढकलून देणे ही योग्य नाही. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळाने सासवड नगरपालिका अशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.
-विनोद जळक, मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद