सरपंचपदासाठी असणार चुरस…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका : पदासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मतदान

पुणे – जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींच्या निवडणूका 2020मध्ये होत असल्याने सरपंचपदासाठी इच्छुक तत्पर झाले आहेत. ज्या गावांत निवडणुका जाहीर होत आहेत, त्यामध्ये सरपंच पदासाठी स्वतंत्रपणे पहिल्यांदाच निवडणूक लढविली जाणार असल्याने या गावांत या पदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. आरक्षणानुसार सरपंच पदासाठी निवडणुका होत असल्याने त्यानुसार उमेदवार असावा, याकरीता तयारी सुरू झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणुकींचा गाव सोहळा असल्याने राजकीय बांधाबांध आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधी संपत आहे. यामध्ये खेड, भोर, शिरूर आणि पुरंदर तालुक्‍यातील ग्रामपंचपायतींचा समावेश आहे. आपल्या मतदार संघातील गावचा सरपंच आपल्या मर्जीतील असावा, यासाठी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असणार आहे. यामुळे अशा उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा धुरळा असूनही सर्वत्र उडत असताना आता गावचा सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. सहा, आठ महिन्यांचा कालावधी असला तरी संरपंच होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

सरपंचपदासाठी स्वतंत्र मत…
जिल्ह्यातील 750 गावात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी यावेळी दुसऱ्यांदा मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतात. त्यातील एक मत आता थेट सरपंचपदासाठी असणार आहे. तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी असणार आहेत. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी देखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्‍त चिन्हांचा वापर केला जाणार असल्याने अशा चिन्हांकडे लक्ष असणार आहे. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीतही वापर होणार नाही.

विशेष मतपत्रिका
सरपंचपदाच्या जागेसाठी पहिली मतपत्रिका असते, साधारण सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळसर असतो. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच लाल, पिवळे असणार आहेत तर अनुसूचित जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा, सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा, साधारणत: असे स्वरूप राहते.

सरपंचपदासाठी शिक्षण…
सरपंचपदाची निवडणूक लढविणारा उमेदवार हा किमान सातवी उत्तीर्ण असण्याची अट आयोगाकडून घालण्यात आलेली आहे. सरपंचपदाकरीता निवडणूक लढविणारी उमेदवार व्यक्ती दि. 1 जानेवारी 1995 मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे, अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम लक्षात घेतला तरी ग्रामस्थ तसेच राजकीय प्रतिनिधींकडून पदवीधर उमेदवारास संधी दिली जात असल्याचे चित्र आहे.

सरपंच निवडीमुळे कडक आचारसंहिता…
जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असतील तेथे सरपंच पदासाठी स्वतंत्र मतदान होत असल्याने कडक आचारसंहीता पाळण्याचे आदेश दिले जातात. ज्या तालुक्‍यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असतील, अशा तालुक्‍याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता कडक असणार आहे.

निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येही आचारसंहिता असणार आहे; तसेच निवडणूक होत नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांवर कोणतेही निर्बंध नसतील, त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)