शासनाच्या योजनेचे वाट न पाहता गावातील गरजूंना घर
काऱ्हाटी – काळखैरेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीने आगळावेगळा कार्यक्रम राबविला असून बारामती तालुक्यात याची मोठी चर्चा आहे. ग्रामपंचायत प्राशसन कसे असावे, कारभार कसा असावा याचे उत्तम उदाहरण ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल भोंडवे यांनी चक्क “सरपंच आवास योजना’ अमलात आणून दाखवून दिले आहे.
शासनाच्या योजनांची वाट न पाहता तसेच त्याद्वारे होणारा विलंब आणि यापासून लाभार्थी वंचीत राहू नयेत याकरीता सरंपचांनीच पुढाकार घेत गावात ही योजना सुरू केली असून याकरीत सर्व सदस्य, गावातील ज्येष्ठ मंडळींचे सहकार्य मिळत आहे.
बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यात असलेल्या काळखैरेवाडी येथील ग्रामपंचायतीने नवनवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. याचा हा दुसऱ्या संकल्प सरपंच आवास योजना असून याची चर्चा तालुक्यातील प्रत्येक गावागावात होत आहे.
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजना आहेत. याबाबत आपण वाचले आणि पाहिले आहे. याद्वारे आवास अर्थातच घर मिळवण्याकरीता कोणकोणत्या प्रशासकीय आणि “अशासकीय’ यंत्रणांना सामोरे जावे लागते, ही संबंधीत लाभार्थींनी अनुभवले आहे. घरकुला बाबत येणाऱ्या अडचणींचा पाढा तर अनेकांना पाठ आहे. अशावेळी गावा पातळीवर सरपंचाद्वारे सुरू करण्यात आलेली सरपंच आवास योजना चर्चेचा विषय ठरली आहे.
बारामती तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची सरपंच आवास योजना राबविली जात असल्याने तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करणारी ग्रामपंचायत म्हणून काळखैरेवाडी ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे. दुर्बल तसेच दारिद्रय रेषेखाली तसेच अन्य लाभार्थ्यांन घर मिळावे, गावात प्रत्येकाचे हक्काचे घर असावे, या उद्देशातून सरपंचांनी ही योजना गावात आमलात आणली आहे.
चालू आर्थिक वर्षात सरपंच आवास योजने मधून चार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. तसेच दरवर्षी पाच घरकुले देण्याचा मानस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे. यासह वेगवेगळ्या छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत ग्रामपंचायतीने आपले कररूपी महसूल वाढविण्यावरही भर दिला आहे. या करामधून गावात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना राबविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सातत्यो केला जात आहे. अनेक गावांना दिशादर्शक ठरेल, असा हा सरपंच आवास योजना ही अन्य गावांकरीताच नव्हे तर राज्याकरीताही रोल मॉडेल ठरणार आहे.
गावातील गरजूंना हक्काचं घर देण्याचे काम शासन करीत आहे. त्यातच प्रतिक्षा यादीमध्ये असणाऱ्यांना गरीब गरजूंना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच घरकुल योजना माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
– विशाल भोंडवे, सरपंच, काळखैरेवाडी, ता. बारामती