सारोळा, नसरापूरचे उड्डाणपूल सुरु; वाहनचालकांत समाधान

किकवी आणि धांगवडीचे उड्डाण पूल पूर्णत्त्वाच्या प्रतिक्षेत

पुणे – मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र. 4) या उत्तर-दक्षिण भारताला जोडणाऱ्या रस्त्यावर पुणे-सातारा मार्गिकेमधील अनेक दिवस प्रलंबित असलेले दोन महत्त्वाचे उड्डाणपूल सुरु झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामध्ये नसरापूर येथील 800 मीर्टसचा उड्डाण पूल सुरु झाला असून खड्डेविरहित प्रवासाचा अनुभव वाहनचालक घेत आहेत. तसेच पुणे जिल्हा सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या पुलाजवळ सारोळा येथील उड्डाण पूलही आता सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याच मार्गावर आता सातारा-पुणे मार्गिकेमधले किकवी आणि धांगवडी येथील उड्डाण पूल सुरु होणे बाकी आहे. या दोन्ही ठिकाणी अद्यापही सेवा रस्त्यांवरुन वाहतूक सुरु असल्याने प्रवासाचा वेळ वाढतो आहे. त्यापैकी किकवीचा उड्डाणपूल आधी तर धांगवडीचा सर्वात शेवटी पूर्ण होण्याची अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्यास गेल्या सहा ते सात वर्षांत अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र काही ना काही कारणाने किमान चार ते पाच उड्डाण पूलांचे काम प्रलंबित होते. शिवाय पावसाळ्यात मुख्य आणि सेवा रस्त्यांवर खड्‌डयांचे साम्राज्य असल्याने सातत्याने हा रस्ता चर्चेत होता. अशातच नियमाप्रमाणे 1 एप्रिलला टोल वाढवण्यात आल्याने पुन्हा एकदा रस्त्याची प्रलंबित कामे चर्चेत आली होती. आता किकवी आणि धांगवडीचे उड्डाणपूल पूर्ण झाले की संपूर्ण 111 किमीचा पुणे-सातारा महामार्ग निर्धोक होणार आहे.

शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खंबाटकी घाटातील सहा पदरी बोगद्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून, ते पूर्ण होताच सातारा-पुणे प्रवासाचा वेळ किमान अर्ध्या तासाने कमी होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.