मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधीमंडळात दाखल झाल्या मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दालनातील हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्यांनी अधिवेशन अर्ध्यावर सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे. हिरकणी कक्षाची दूरवस्था पाहून सरोज अहिर यांनी नाराजी व्यक्त केली तसेच हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यासाठी आमदार सरोज अहिरे या आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आल्या होत्या. पण बाळासाठी हिरकणी कक्षाच्या नावावर एक खोली रिकामी करून देण्यात आली, त्यात पुरेशी व्यवस्था देखील नव्हती त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या.हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी आले. नागपूर अधिवेशनात आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्यानंतर नागपुरात त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनालाही सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत. परंतु हिरकणी कक्ष खराब असल्याने विधीमंडळातून काढता पाय घेतला आहे.
विधानभवनातील हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज आहिरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या अधिवेशनात माझ्या लहान मुलाला घेऊन आलेले आहे. लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही मी घेऊन आले आहे. माझ्या मागण्यांची योग्य दखल घेतली नाही तर मी पुन्हा माझ्या मतदारसंघात जावे लागेल, असे सरोज अहिरे म्हणाल्या.
आमदार सरोज आहिरे म्हणाल्या, लोकप्रतिनिधींसोबत लहान मुले असतील त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. सचिवांना या संदर्भातले पत्र देखील दिले होते. मात्र हे सर्व करुनही हिरकणी कक्षामध्ये प्रचंड धूळ आहे. कक्षातील सोफे देखील फाटलेले आहेत. त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला कसं ठेवणार? शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. जर यात आज बदल केले नाहीत तर मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल.
विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षाची अवस्था पाहून त्यांनी काढता पाय घेतला.