सातारा,दि.31 (प्रतिनिधी)
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. यामुळे त्याठिकाणी येण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, यापूर्वी सांगली, सोलापूर व सातारा एलसीबीच्या कामकाजाचा व गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असणारे पो.नि. विजय कुंभार हेच प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
तर दुसरीकडे कराड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. बी.आर. पाटील, कराड तालुक्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, गडचिरोलीवरून नव्याने येत असलेले बाळासाहेब भरणे या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, कामाचा अनुभव, गुन्हे डिटेक्शनची पध्दत या सगळ्यांचा विचार करून पोनि. विजय कुंभार यांची वर्णी लागणे अपेक्षित आहे.
पो.नि. सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीणवरून एक वर्षापूर्वी सातारा एलसीबीला बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे अन् तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांच्यात चांगले बॉंडींग बनले होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाल जिल्ह्याच्या स्मरणात राहील असा आहे.
एक वर्षात खून, दरोडा सारख्या अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, त्यांनी सोलापूर ग्रामीणसाठी विनंती बदलीला अर्ज केल्याने त्यांची शुक्रवारी बदली झाली. दरम्यान, सातारा एलसीबीची जागा रिक्त झाल्याने आता येथे कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पो.नि. विजय कुंभार यांच्याकडे एलसीबीचा चार्ज होता.
त्यांनीही जिल्ह्यात कामाचा धडाका लावत अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. मात्र, चाकोरीत चालणाऱ्या या अधिकाऱ्याला तत्कालीन एसपी सातपुते यांच्याशी जुळवून घेण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांची बदली न करता सातपुते यांनी एलसीबीला पाटील यांची वर्णी लावली होती.
त्यानंतर कुंभार यांच्याकडे सध्या जिल्हा विशेष शाखेचा कार्यभार आहे. सातारा एलसीबीच्या कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. वास्तविक गत वर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा व लोकसभा पोट निवडणुकीच्या कालावधीत बॅक बोन म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय राहिले आहे.
याशिवाय मोक्का, तडीपारी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. साताऱ्यात येण्यापूर्वी त्यांनी सोलापूर व सांगली जिल्ह्यात कृष्णप्रकाश,विरेश प्रभू, रविंद्र शिसवे या एसपींसोबत कार्यकाल पूर्ण होईपर्यंत एलसीबीचे काम पाहिले आहे.
तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे असलेले संबध पाहता सातारा एलसीबीसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पो.नि. किशोर धुमाळ यांनी देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात चांगली कामगिरी करून साताऱ्यातील कोजागिरी राड्यात फ्रंट साईड सांभाळून पुढील अनर्थ टाळला होता.
तर पो.नि. बाळासाहेब भरणे हे दीड वर्षापूर्वी साताऱ्यातून गडचिरोलीला बदलून गेले होते. मात्र, अवघ्या दीड वर्षात ते परत आल्याने व विद्यमान एसपी देखील गडचिरोलीवरून आल्याने त्यांच्याही नावाची चर्चा आहे.
याशिवाय सातारा जिल्ह्यात सध्या कराड शहरला कार्यरत असलेले पो.नि. बी.आर. पाटील हे देखील वरिष्ठ असून त्यांना देखील सातारा जिल्ह्याचा अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी सातारा शहर वाहतूक, सातारा शहर तसेच कराड पोलीस ठाणे येथे सेवा बजावली आहे. कराड मधील वाढती गुन्हेगारी यामुळे त्यांना दुसऱ्यांदा तेथे नियुक्ती देण्यात आली आहे.
त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत असले तरी कराडच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज असल्याने सातारा एलसीबीला नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हा पोलीस दलाचे डोळे लागले आहेत.