पिंपरी, (प्रतिनिधी) – स्थानिक संस्था कर विभागाकडील प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार कार्यालय अधिक्षक सरिता मारणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशाने त्याला मान्यता देण्यात आली आहे.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या पदाचे अतिरिक्त पदभाराचे कामकाज पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आले आहे. कार्यालय अधिक्षक पदाचे सोपविलेले कामकाज सांभाळून अतिरिक्त कामकाज करण्याचे व त्या अनुषंगाने प्रदान केलेले अधिकार वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तत्कालीन प्रशासन अधिकारी सविता आगरकर महापालिका सेवेतून ३१ मे रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर विभागाकडील प्रशासन अधिकारी पदाचे कामकाज अन्य प्रशासन अधिकारी यांच्याकडे सोपविणे आवश्यक होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी पदावरील अधिकारी संख्येने कमी आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने प्रशासन अधिकारी पदावर अधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरिता मारणे यांच्याकडे अतिरिक्त पदभाराचे कामकाज सोपविण्यात आल्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.