संतोष पवार
आ. शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात कोणाला संधी देणार?
सातारा – सातारा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने या पदासाठी जोरदार रस्सीखेच आहे. किडगाव गणातील सरिता इंदलकर आणि अंबवडे गणातील विद्या देवरे यांच्यात रस्सीखेच असून आ. शिवेंद्रराजे कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सातारा पंचायत समितीवर स्थापनेपासून अभयसिंहराजे भोसले यांचे आणि त्यांच्या निधनानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. शिवेंद्रराजे म्हणतील त्या सदस्याला पंचायत समितीत पद मिळणार, अशी स्थिती आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी 11 जागा जिंकून पंचायत समितीत सत्ता मिळवली होती. माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे सहा तर भाजपचे तीन सदस्य निवडून आले. पहिल्या अडीच वर्षांसाठी खेड गणातील मिलिंद कदम यांना सभापतिपद तर लिंब गणातील जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपद मिळाले होते.
आता सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने रस्सीखेच होणार आहे. या पदासाठी सरिता इंदलकर दावेदार मानल्या जात आहेत. त्या आणि त्यांचे पती संभाजी इंदलकर हे आ. शिवेंद्रराजे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी किडगाव गणात चांगले काम केले आहे. अंबवडे गणातील विद्या देवरे याही दावेदार असून त्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्या कट्टर समर्थक आहेत. परळी खोऱ्याने विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंना भक्कम साथ दिली होती. त्यात राजू भोसले यांचा सिंहाचा वाटा असल्याने विद्या देवरे यांना सभापतिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्णे गणातील कांचन काळंगे, अतित गणातील बेबीताई जाधव, शेंद्रे गणाच्या छाया कुंभार व अन्य महिला सदस्य सभापतिपदाच्या शर्यतीत आहेत. आ. शिवेंद्रराजे यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सरिता इंदलकर आणि विद्या देवरे यांच्यातच रस्सीखेच आहे. कांचन काळंगे यांचा गण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर बेबीताई जाधव यांचा गण कराड उत्तर मतदारसंघात येतो. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.