हजारो संसार सावरणारे सारिकाताईंचे दातृत्त्व

“घेणारे हात लक्षावधी,
देणारे हात न दिसे…
न मागताही झोळी भरे,
देवमाणूस तो असे !’

आजच्या युगात अशी न मागता झोळी भरणारी देवमाणसे जवळपास नाहीच्या बरोबरच! देवाच्या दयेने उत्तम सांपत्तिक परिस्थिती असणारे आपल्या अवती-भवती भरपूर दिसतात… पोटभर खाऊन झाल्यानंतर उरलेलं अन्न एखाद्या भुकेलेल्याच्या मुखात न देताकचऱ्यात फेकून देणारे “कर्म’दरिद्री माणसेही आपल्याला दिसतात… पण सारिका सुनील शेळके यांच्यासारखी मोजकी माणसे अशीही दिसतात, जी आपल्या घासातला घास काढून गरजवंताला देतात… अतिशय उत्तम आर्थिक परिस्थिती जन्मलेल्या आणि लग्नानंतरही श्रीमंत घरात आलेल्या संवेदनशील स्वभावाच्या सारिकाताईंनी अत्यंत मोठ्या मनाने सर्वांना मदतीचा हात दिला आहे. “दिल्याने वाढते’ या म्हणीचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहूनच येतो. अर्थात आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना त्यासाठी मनात असावी लागते.

सारिकाताईंकडे ती जन्मजात आहेच. आपल्याबरोबरच दुसऱ्याचेही चांगले व्हावे यासाठी म्हणूनच त्यांची नेहमी धडपड सुरू असते. असंख्य गरजू महिलांसाठी “देवमहिला’ ठरलेल्या संवेदनशील सारिकाताईंच्या या सामाजिक कामात त्यांचे पती, मावळचे आमदार आणि अत्यंत हळव्या स्वभावाचे सुनील शेळके यांचीही त्यांना भक्कम साथ असतेच.

सारिकाताईंचे माहेर भोसरी, पुणे येथील असून, उद्योजक बाळासाहेब कोंडीबा लांडगे यांच्या त्या कन्या. त्यांना त्यांच्या कुटुंबातून लहानपणापासूनच सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. तळेगाव दाभाडे येथील उद्योजक शंकरराव बाजीराव शेळके यांचे चिरंजीव तथा मावळचे कार्यक्षम आमदार सुनीलआण्णा शेळके यांच्यासोबत 2003 मध्ये विवाह झाला. सुनीलअण्णांना सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांचे वडील उद्योजक शंकरराव बाजीराव शेळके यांच्याकडून मिळाली. सारिकाताईंना पती सुनील शेळके यांची मोलाची साथ मिळाल्याने मावळ तालुक्‍यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी ठोस पाऊल उचलले.

गरीब, गरजू व वंचित महिलांच्या सबलीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कुलस्वामिनी महिला मंचाची स्थापना केली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई व माता रमाई आदी महिलांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच तसेच कुलस्वामिनी महिला मंचाच्या माध्यमातून मावळ तालुक्‍यातील गरीब, गरजू व वंचित महिलांचे संघटन केले. त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मुली व महिलांना मदतीचा हात देत 15 हजार महिलांना मोफत शिवण वर्ग व फॅशन डिझाईनिंगचे प्रशिक्षण दिले.

उच्चशिक्षित महिलांना संगणक प्रशिक्षणाची गरज ओळखून त्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले. त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. काही महिलांना उद्योग उभारण्यासाठी बॅंकेकडून कर्ज उपलब्ध करून देवून त्यांच्या उद्योगांना चालना दिली. महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी मावळ तालुक्‍यात प्रबोधनातून खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम घेवून त्यांना संधी दिली. मावळ तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान सत्कार केला. याशिवाय सारिकताई अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिला व मुलींना समुपदेशन देवून त्यांना मदतीचा हात देतात. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या साथीने महिला व मुलींच्या समस्या सोडवित आहेत.

सारिकाताईंनी पुढाकार घेऊन मुलींना परीक्षा केंद्रावर व घरी वेळेत पोहचता यावे यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या कायमच अग्रेसर राहतात. महिला ही या जगाची अप्रतिम निर्मिती असून, ती आदिशक्ती आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. मुली व महिलांनी स्वतःतील शक्ती ओळखून आत्मविश्वासाने, चिकाटीने, सातत्याने प्रयत्न केल्यास जगात अशक्‍य काहीच नाही.

मुली व महिलांना सर्वच क्षेत्र खुली असून ते खुणावत आहे. मुली व महिलांनी संकटांचा सामना केल्यास ती नाहीशी होतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा वाटा सिंहाचा आहे. महिलांचा जेव्हा सर्वत्र सन्मान होईल तेव्हाच खरा महिला दिन साजरा होईल, असे सारिकताई म्हणतात. खरेच आहे… सारिकताई शेळके यांच्यासारख्या मोठ्या मनाच्या महिलांनी पुढाकार घेऊन गरजू महिलांना मदतीचा हात दिल्यास समाजातील महिला आणखी सक्षम होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.