चिंबळी – मोई (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आनंद गवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून करण्यात आली.
मोई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने राहुल गवारी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी मंडल तथा निवडणूक निर्णय अधिकारी चेतन चासकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी सारिका गवारी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे चासकर यांनी जाहीर केले.
याप्रसंगी गीतांजली गवारी, निर्मला कडवे, पल्लवी गवारी, संदीप जाधव, तलाठी दीपक जाधव, ग्रामसेवक भास्कर वीर हे उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच सारिका गवारी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच राहुल गवारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, करोनामुळे यावेळी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात आली नाही. यावेळी आनंद गवारी, किरण गवारी, मारुती येळवंडे, देवीदास मेदनकर, मोहन गवारी, गोरख गवारी, रवी गवारी, संतोष गवारी, समीर गवारी, संजय गवारी उपस्थित होते. तर महाळुंगे इंगळे पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
– राहुल गवारी, मावळते सरपंच, मोई ग्रामपंचायत