सैराट प्रकरण वेगळ्याच वळणावर; पोलिसांच्या तपासात धक्‍कादायक बाब पुढे

पतीनेच पेट्रोल ओतून पत्नीला पेटवून दिले 
नगर: पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा प्रकार सैराट नसून पतीनेच पत्नीला जाळून मारल्याचा वास पोलिसांना आला आहे.

सोमवारी सकाळी निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर जिल्ह्यात नव्हे राज्यात पुन्हा खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तपास वेगाने सुरू केला आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक मनिष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. घटन घडल्यानंतर घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे, रुख्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली.

या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यानंतर हे सैराट प्रकरण नसून मंगेशनेच रूख्मिणीला पेटवून मारल्याच प्रथम दर्शनी समोर आले आहे. मंगेशने पेटवून दिल्यानंतर रुख्मिणीने मंगेशला मिठी मारली. त्या मंगेश भाजला असल्याचे तपासात आढळून आले आहे.स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रुख्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटूंबांचा विरोध नव्हता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच गुन्हेगारी प्रवत्तीच्या मंगेशने रुख्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून तो तीला बेदम मारहाण करीत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुख्मिणीला मारहाण केली होती. मारहाणीला कंटाळून रुख्मिणी गावातील आपल्या माहेरी निघून आली.

रुख्मिणी माहेरी आली असली तरी मंगेश कधीही येवून त्रास देईल ही भिती होती. या भितीने रुख्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुख्मिणी व तीच्या लहान भावंडाना घरात ठेऊन दाराला बाहेरुन कुलुप लावून जात असे. घटना घडली त्या दिवशीही घरात रुख्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (वय 6), करिश्‍मा (वय 5) विवेक (वय 3) घरातच होते. आई घराला बाहेरुन कुलुप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडिलही सकाळीच मजुरीसाठी बाहेर पडले होते. रुख्मिणी रहात असलेले घर जुन्या बांधणीचे, लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. 1 मे रोजी मंगेशने घराच्या मागच्या बाजूने, पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुख्मिणीच्या अंगावर ओतले व तीला पेटवले. रुख्मिणीने पेट घेतल्यावर तीने मंगेशला मिठी मारली.

रुख्मिणीचा लहान भाऊ निंनचूने घटना नेमकी कशी घडली हे पोलीसांना सांगीतले आहे. पोलीसांनीही चिंनचूचा जबाब नोंदवला आहे. चिंनचू बरोबरच करीष्मा, विवेक ही लहान भावंडेही घटना घडली. त्यावेळी घरात होती. झालेल्या घटनेने घाबरलेली ही लहान मुले घराच्या कोपऱ्यात बसली होती.

आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रुख्मिणी स्वत: घराबाहेर आली. पाठोपाठ मंगेशही आला.तो पर्यंत रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून रुख्मिणीला व मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथे उपचारा दरम्यान रुख्मिणीचा मत्यू झाला.

पोलीसांनी मंगेशच्या फिर्यादीनुसार ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला असला तरी भरतीया आणि रणसिंग ही दोन्ही कुटुंब परराज्यातून मोलमजुरीसाठी निघोज येथे आले आहेत. रोजच्या जगण्याचे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत अशा परिस्थित हा प्रकार होण्याची शक्‍यता नाही. मंगेशने हा बनाव केल्याचे सध्या तरी समोर येत असले तरी पुढील तपासात आणखी काही घटना पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.


महिला आयोगाकडून दखल
या सैराट प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून पोलिसांना अहवाल मागविण्यात आला आहे. महिला आयोगाच्या सदस्य मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पोलिसांनी पत्र दिले असून पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे. याची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.


मुलींच्या वडीलांना घेतले ताब्यात
पोलिसांनी या प्रकरणी मामा व काकाला अटक केली आहे. आज मुलीचे वडील रामा भरतीया याला ताब्यात घेण्यात आले आहे. भरतिया याला आज सकाळी उत्तरप्रदेश येथील कौशंबी जिल्ह्यातील चाहल तालुक्‍यातून ताब्यात घेतले असून त्याला पारनेरला आणणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.