“सारथी’ची स्वायत्तता टिकवणार उपमुख्यंत्री अजित पवार, संस्थेला उद्याच 8 कोटींची मदत

 

मुंबई – करोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नसून सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार आहे. यासाठी सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच उद्याच 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य करत अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका. सारथीचं काम नियोजन विभागाच्या अखत्यारित घेतले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अखत्यारित घेणार, असेही त्यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाने गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित पवारांनी दालनात बैठक घेतली. सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेली संस्था आहे. ती बंद होणार नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरु होईल. ही संस्था भविष्यात स्वत:च्या पायावर उभी राहिल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करु. सरकारकडून मदतीऐवजी आर्थिक रसद स्वत: उभी करण्याकडे कल असेल, अशी योजना संभाजीराजेंनी सांगितली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.