पुणे – विमानतळ परिसरातील सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले याला दोन वर्षासाठी पुणे शहर व जिल्हयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द खंडणी व शरीराविरुद्दचे गुन्हे दाखल आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून तो कार्यरत होता. परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी त्याच्या तडीपारीचा आदेश काढला.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार त्याच्यावर दोन ते तीन खंडणीचे गुन्हे व एक शरीराविरुध्दचा गुन्हा दाखल आहे. त्याला वारंवार समज देऊनही त्याच्या वर्तवणूकीत सुधारणा झाली नाही.
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावावर आठवडा भरापुर्वीच पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सही करुन तडीपारीचा आदेश काढला.
चौकट : भोसले याचे फास्ट फुडचे हॉटेल आहे. तसेच तो माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत होता. त्याने अनेक अनधिकृत बांधकामांची माहिती महापालिकेतून माहिती अधिकारात काढून घेतली होती. याच्या आधारे तो ब्लॅकमेलिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.