मुंबई – टीव्ही इंडस्ट्रीतून एक अतिशय धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे रस्ते अपघातात निधन झालं. वैभवी उपाध्यायच्या निधनाचे वृत्त समोर येताच टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वैभवी उपाध्याय यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सेलिब्रिटींसह चाहत्यांना हादरवून सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवीचा अपघात कुल्लूच्या बंजारमध्ये सोमवारी झाला वैभवी उपाध्याय तिच्या मंगेतरसोबत कारमधून प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ती तीर्थन व्हॅलीमध्ये फिरायला जात होती. पण एका वळणावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि तिचा अपघात झाला. कार दरीत पडली. वैभवीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीला मोठा धक्का बसला आहे.
मालिकेचे निर्माते जेडी मजेठीया यांनी अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वैभवीच्या निधनाबद्दल बोलताना जेडी म्हणाले की, ‘मला खरच खूप मोठा धक्का बसला आहे. ती एक सुंदर व्यक्ती आणि अफलातून अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. जास्मीन या व्यक्तिरेखेने तिला ओळख मिळवून दिली.’