उत्तरेत सपनाच्या लोकप्रियतेचा फायदा होण्याची शक्यता
चंदिगड – गायिका आणि डान्सर सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या आधी सपना चौधरी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र सपनाने हे वृत्त साफ फेटाळून लावले होते.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज तिवारी सपना चौधरी आणि कुमार विश्वास यांची भेट घेतली होती. यानंतर मनोज तिवारी यांच्यासोबत प्रचार करताना देखील सपना चौधरी दिसली होती. त्यामुळे भाजपकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात होती. पण बरेच दिवस तळ्यात मळ्यात अशाच प्रकारची स्थिती असल्याने चित्र स्पष्ट होत नव्हते. अखेर लल्लनटॉप या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली. मात्र तिचा भाजप प्रवेश निश्चित झाला असला तरी लोकसभेचे तिकीट मिळणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सपनाला लोकसभेचे तिकीट दिले जाण्याची शक्यता सूत्रांकडून देण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकांचा चौथा टप्पा पार पडला असून उमेदवार आणि जनतेतील उत्साह वाढताना पाहायला मिळत आहे. देशातील पुढल्या चार टप्प्यांचे मतदान अजून बाकी आहे. यामध्ये विशेष करून उत्तरेकडील राज्य मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या देशाचे लक्ष या राज्यांकडे लागले आहे.