कामगार संहिताच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले जाणार
पुणे – कामगारांच्या आणि कंपन्यांच्या परस्परसंबंधातील तक्रार निवारणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना नव्या कामगार कायद्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. या नियमांची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याकडे देखरेख ठेवण्यासाठी “संतुष्ट’ नावाचे पोर्टल जानेवारीत उपलब्ध करण्यात येणार आहे.
कामगारांच्या आणि कंपन्यांच्या तक्रार निवारणासाठी याचा उपयोग होईल, असे कामगार विभागाने सांगितले आहे. सुरुवातीला या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांचा आरोग्य विमा आणि इतर बाबीकडे लक्ष देण्यात येणार आहे. कामगार कार्यालय आणि विभाग यांच्याकडून तक्रारीची योग्य दखल घेऊन त्याचा वेळेत निपटारा केला जातो का, याची माहिती या पोर्टलमध्ये वेळोवेळी जनरेट होणार आहे. त्यामुळे या विभागांच्या कामकाजाकडे कामगार विभागाचे निरंतर लक्ष राहणार आहे.
कामगार आणि कंपन्यांना आपल्या तक्रारी या पोर्टलवर मांडता येणार आहेत. या अगोदर जवळजवळ 44 कामगार कायदे होते. त्याचे वर्गीकरण आतात चार संहितांमध्ये करण्यात येत आहे. त्यात वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणची सुरक्षितता यांचा समावेश आहे.