नांदेड – राज्यभर गाजलेल्या कृष्णुर धान्य घोटाळ्यातील आरोपी आणि नांदेडचे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांची शासनाने पुन्हा पदस्थापना केली आहे. त्यांच्याविरोधात कुंटुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेणीकर बराच काळ अज्ञातवासात होते.
16 जून 2022 रोजी त्यांना अटक झाल्यानंतर निलंबित करण्यात आले. मात्र त्यानंतरही आढावा समितीने या प्रकरणाचा आढावा घेऊन त्यांची महसूल खात्यात अकार्यकारी पदावर नेमणूक करण्याची शिफारस केली. त्यानुसार वेणीकर यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
अनेक गंभीर आरोप असताना देखील शासकीय अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याचे प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कारण राज्यभरात गाजलेल्या नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि करोना काळात जामिनावर सुटलेले संतोष वेणीकर यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर अटक होण्याच्या भीतीने वेणीकर तब्बल साडेतीन वर्षे भूमिगत झाले होते. शेवटी शरण आले आणि त्यांना अटक झाली. मात्र, करोना काळात त्यांना जामीन मिळाला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या घोटाळ्यातील संशयित आरोपी असलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा सवेत सामावून एका चांगल्या ठिकाणी बदली करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
राज्यभर खळबळ माजवणारा कृष्णूर धान्य घोटाळा 18 जुलै 2018 रोजी नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी उघड केला. त्यांनी धान्य घेऊन जाणारे 19 ट्रक पकडले. त्यात स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ होते. याप्रकरणी सर्व पुरावे जमा झाल्यानंतर 19 जणांविरुद्ध दोषारोपत्र दाखल झाले होते. कृष्णूर धान्य घोटाळा घडला त्यावेळी नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी संतोष वेणीकर होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधातही कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा होता. त्यानंतर ते तब्बल साडेतीन वर्षे भूमिगत होते. मात्र, पोलिसी दट्ट्याने ते 16 जून 2022 शरण आले. वेणीकरांना एक वर्ष तुरुंगात घालवावे लागले. कोरोनानंतर ते जामिनावर बाहेर आले.