पुणे – उरूळी कांचनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून कुख्यात गुंड संतोष जगताप याच्या खून प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली. २२ ऑक्टोंबर रोजी ही घटना घडली होती.
उमेश सोपान सोनवणे (रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. उरूळी कांचनमधील सोनाई हॉटेलसमोर संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगतापचा मृत्यू झाला. तर, यावेळी झालेल्या क्रॉस फायरींगमध्ये मारेकयांमधील स्वागत खैरेचा मृत्यू झाला होता. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.
जगताप खून प्रकरणात पोलिसांनी यापुर्वी पवन मिसाळ, महादेव आदलिंगे यांना अटक ़केलेली आहे. तर, उर्वरीत आरोपींचा शोेध सुरू होता. पोलीस तपासात उमेश सोनवणे हा गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सोनवणे पसार झाला होता. तो शिरूर परिसरातील पीर फाटा येथे थांबल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक राजू महानोर यांना मिळाल्यानंतर सापळा रचून सोनवणेला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर, अमित गोरे, नितीन गायकवाड, अमित साळुंके, राजेश दराडे, बाजीराव वीर यांनी केली.