santosh deshmukh case – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे.
हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर pic.twitter.com/zzKyMHsHse
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 21, 2025
राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी आणि एसआयटीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेर हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता.
त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. हा सुरक्षारक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता. त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
हत्येच्या दिवशी आरोपींची फोनाफोनी –
संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. सर्व आरोपी आता कोठडीमध्ये असून या प्रकरणाचा एसआयटी तपास करत आहे. कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला होता. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती असल्याचेही पोलिसांनी कोर्टात म्हटले होते. दरम्यान, आता वाल्मीक कराडविरोधात पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्याने कारवाईला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अटकेतील आरोपी
1. जयराम चाटे (हत्या प्रकरण)
2. महेश केदार (हत्या प्रकरण)
3. प्रतीक घुले (हत्या प्रकरण)
4. विष्णू चाटे (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
5. सुदर्शन घुले (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
5. सुधीर सांगळे (हत्या प्रकरण)
8. वाल्मिक कराड (खंडणी प्रकरण)
फरार आरोपी
1. कृष्णा आंधळे (हत्या प्रकरण)