Santosh Deshmukh Case – जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास 2 ते 3 तास हे आंदोलन चालले. पोलिसांचे आश्वासन आणि मनोज जरांगेंच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. दुसरीकडे संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज न्यायालयाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती. त्याची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 34 दिवस उलटून गेले आहेत. या काळात पोलिसांनी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेतले. विष्णू चाटे हा या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असून, आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की, पोलिस कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. केज न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने अवघ्या काही मिनिटांतच विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाल्मीक कराडची उद्या कोठडी संपणार –
याच प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मीक कराडवरही खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याची कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी त्याला केज न्यायालयात हजर केले जाईल.