#Video : हरीनामाच्या जयघोषात वाखरीत माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न

वाखरी – वारकऱ्यांचा अपूर्व उत्साह, जोडीला हरीनामाचा गजर…अश्वाची धाव आणि शिगेला गेलेला माऊलीं माऊलीचा गजर आणि वरूणराजाची हजेरी अशा चैतन्यमय वातावरणात वाखरीत बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीं सोहळ्यातील रिंगण पार पडले.

पंढरीच्या वारीतील अखेरचे भव्य गोल रिंगण बाजीराव विहीर येथे आज पार पडले. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण संपन्‍न झाले. दोन्ही अश्‍वांनी वायूवेगाची नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहिरीजवळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे तालुक्यातील पहिले व माऊलीचे शेवटचे गोल रिंगण मोठ्या भक्‍तिभावाने संपन्‍न झाले. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले होते.

ज्ञानोबा-तुकाराम-विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, अश्‍वाबरोबर धावणारे वैष्णवजन, डौलाने फडकणार्‍या पताका, टाळ-मृदंगाचा गजर… अशा भक्तीमय वातावरणात पंढरीनगरीजवळ असलेल्या बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण सोहळा लांखो भाविकांनी पाहिला. टाळ-मृदुगांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

हा रिंगण सोहळा सुरू असताना काही माऊलींनी जागेवरती मनोरे तयार करून टाळमृदुगंच्या जयघोषात माऊली माऊलीचा जयघोष केला. दोन फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर अश्‍वाच्या पाया खालची माती कपाळी लावण्याची वैष्णवांची एकच झुबंड उडाली.

वाखरीत सर्व संतांच्या पालख्या एकत्र आल्यामुळे बुधवारी वाखरीचं रूपांतर भक्तिसागरात झालेलं पाहायला मिळालं. सकाळपासूनच लहानमोठ्या दिंड्या वाखरीच्या पालखी तळावर हजेरी लावत होत्या. आनंद व प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी विठू माऊलीच्या ओढीने निघालेला संतांचा विराट मेळा आज पंढरीसमीप वाखरीत विसावला.

दरम्यान, मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उडीचा खेळ भक्तिमय वातावरणात पार पडला़ सायंकाळी टप्पा येथे संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधूंची भेट झाली. त्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी भंडीशेगाव येथे विसावल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.