Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan – श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या प्रमुख विश्वस्तपदी प्रसिद्ध भारुडकार आणि कीर्तनकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची २०२६ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे वारकरी संप्रदायात आणि आळंदी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.या बैठकीला मावळते प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ॲड. रोहिणीताई पवार उपस्थित होते, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. डॉ. भावार्थ देखणे हे मूळचे वारकरी संस्कारांतील असून त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांच्याकडे तीन पदव्युत्तर पदव्या असून व्यवस्थापन या विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. सध्या ते बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये एच.आर. हेड म्हणून कार्यरत आहेत. डॉ. देखणे यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही इंग्रजी भाषेतून कीर्तने आणि भारुडे सादर करून वारकरी संप्रदायाचा वैश्विक प्रसार केला आहे. सन २०२५ च्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात त्यांनी सोहळा प्रमुख म्हणून अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा, आधुनिक शैक्षणिक पात्रतेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग संस्थानच्या प्रशासकीय कामकाजात होईल, असा विश्वास संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.