आंदर मावळात ‘संकल्प फार्म’च्या व्यवस्थापकावर गोळीबार

दोघे हल्लेखोर पसार : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटार थांबविली

टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील वाहनगाव येथील संकल्प फार्म हाऊसकडे निघालेल्या व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. बुधवारी (दि. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात व्यवस्थापकाच्या पोटाला तीन गोळ्या लागल्या असून, मानेजवळून एक गोळी चाटून गेली. त्याच्यावर सोमाटणेतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आहे. मिलिंद मधुकर मनेरीकर (रा. तळेगाव स्टेशन) असे गोळीबार झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास मनेरीकर हे नेहमीप्रमाणे मोटारीतून नागाथली गावाजवळच्या कच्च्या रस्त्याने जात होते. वडेश्‍वर-वाहनगाव मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर अंतरावर मनेरीकर यांची मोटार पोहोचली. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हात दाखवून त्यांची गाडी थांबली. मोटारीची काच खाली घेताच त्यांच्यावर जवळून गोळीबार केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

मनेरीकर त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे सहकारी चेतन निमकर यांनी ही माहिती फार्ममधील कर्मचाऱ्यांना दिली. कामगारांनी त्यांना तातडीने सोमाटणेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नाकाबंदी केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी 4 तपास पथके रवाना करण्यात आली. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण विवेक पाटील, सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग नवनीत कुमार कॉवत, वडगाव मावळ ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.