शिर्डी – बॉंलीवुडचा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता संजय दत्त याने तब्बल तेरा वर्षानंतर गुरुवारी शिर्डीत येऊन साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले.
हिंदी चित्रपटात नावलौकिक मिळविलेल्या सुपरस्टार सिनेअभिनेता संजय दत्तने काल गुरुवारी मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. तब्बल तेरा वर्षानंतर संजुबाबा साईंच्या दरबारी आल्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दत्त परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. पिता सुनिल दत्त हे सुद्धा नेहमीच शिर्डीत साई दर्शनासाठी येत होते. अलिकडेच बहीण प्रिया दत्त यांनी देखील साईंचे दर्शन घेतले. स्पेशल विमानाने संजय दत्तचे दुपारी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शिर्डीला येवून साईच्या समाधीचे दर्शन घेत आरती केली. संजूबाबा शिर्डीत येणार याची बातमी वाऱ्यासारखी साईनगरीत पसरली आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी एक झलक संजूबाबाची पाहण्यासाठी गर्दी केली.
साईदर्शनांनतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी संजय दत्तचा साईबाबांची मुर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर सुरक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे, साईनाईन क्रिकेट अँकडमीचे संचालक साईराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या बाहेर पडतांना प्रवेशव्दार क्रमांक चारने संजय दत्त निघाल्यावर यावेळी सेल्फी काढण्यांनी ग्रामस्थ तसेच भाविकांनी त्यांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर काहींनी संजूबाबाचा नारा देत लक्ष आकर्षित केले.