-अमित डोंगरे
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या खेळीनंतरही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवता आले नाही. यजमान संघाला व्हाइटवॉश देण्याची संधी आपण गमावली ही चूक कोणाची. खरेतर केवळ एका कोणाला जबाबदार धरून उपयोग नाही. भारतीय मानसिकतेतूनच कोहलीच्या संघाचा पराभव झाला.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढताना कोहलीच्या संघाने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकाही खिशात टाकली. आता मालिका तर जिंकलीच आहे मग कशीही फलंदाजी केली तरी चालते किंवा कसेही बाद झाले तरी कोणी संघातील स्थान गमावणार नाही. या विचारांची असलेली मानसिकताच कोहली आणि कंपनीला भोवली. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले. त्यावेळी यजमान संघाला व्हाइटवॉश देण्याची चालून आलेली संधी आपल्या फलंदाजांनी गमावली.
या दौऱ्यावर आल्यापासूनच आपली गोलंदाजी संमिश्र यश मिळवत आहे. टी. नटराजन वगळता संघातील एकाही गोलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. चहलने रवींद्र जडेजाच्या जागी खेळण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने केले होते. मात्र, त्याच्या कामगिरीतही सातत्याचा अभावच आहे. ऑस्ट्रेलियाने उभारलेली धावसंख्या कठीण होती पण अशक्य निश्चितच नव्हती. टी-20 सामन्यात तर आपण जास्त सरस होतो. यंदाच्या वर्षी सलग 9 सामने जिंकण्याची कामगिरी केलेला संघ व्हाइटवॉश देण्याची संधी इतक्या बेजबाबदार पद्धतीने फलंदाजी करून गमावतो तेव्हा वाईट वाटते.
संघाचा विचार केला तर गुणवत्ता ठासून भरलेली आहे पण मोक्याच्या क्षणी जर ती दिसली नाही तर उपयोग शून्य असतो. आता हा तिसरा सामना भारतीय संघाने गमावला; परंतु त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होतात. मयंक आग्रवाल, मनीष पांडे, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह व महंमद शमी या पाचही खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यामागे नक्की कोणता विचार होता. कर्णधार कोहलीचे काही निर्णय अनाकलनीय ठरत आहेत हेदेखील सिद्ध होत आहे.
पण मग मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री अंतिम संघ निवड करताना या गोष्टींचा विचार करतात की नाही. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल आक्रमक फलंदाजी करत असताना आपले गोलंदाज दिशा व टप्पा राखण्यात का कमी पडले. वेड व मॅक्सवेलला हाफ व्हॉली, फुलटॉस तसेच लेगसाईडला जाणाऱ्या चेंडूंची रसद का पुरवली गेली. शार्दुल ठाकूर व चहल यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावर खरेतर यजमान संघाने द्विशतकी धावांची मजल मारायला हवी होती.
गोलंदाजांनी गमावल्यावर फलंदाजांनी तरी कमवायला हवे होते. मात्र, ते देखील दिसले नाही. नेहमीप्रमाणे कर्णधार कोहलीच केवळ ठामपणे खेळपट्टीवर उभा होता. अर्थात अर्धशतकी खेळीनंतर त्यानेही विकेट बहाल केली. खरा प्रश्न निराळाच पडतो. संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांच्यासह ठाकूरलाही आणखी किती संधी द्यायच्या.
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल स्पर्धेत एकदा सांगितले होते की त्याला काही नवोदित खेळाडूंमध्ये काही चमकच दिसत नाही. त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. मात्र, सॅमसन व अय्यर ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता जबाबदारी कशाला म्हणतात यासाठी खासगी शिकवणी लावली पाहिजे. आता कोहलीच्या संघावर टीका सुरू होईल व कसोटी मालिका सुरू झाल्यावर टीकेचे धनी अन्य काही खेळाडू बनतील. जेव्हा संघ जिंकेल तेव्हा कौतुक व हरला की टीका हेच चक्र यापुढेही सुरूच राहील.
मालिका जिंकली ना मग अखेरचा सामना गमावला तर त्यात काय मोठे असेही प्रश्न विचारणारे महाभाग आहेतच. पण याच मानसिकतेने भारतीय क्रिकेटचे नुकसान केले आहे हे कोणीही ध्यानात घेत नाही. वाईट त्याचेच वाटते. निदान आता तरी निवड समितीने क्रिकेटच्या तीनही प्रकारांसाठी पाच प्रमुख खेळाडू संघात कायम ठेवून पाच नवोदित परंतु स्पेशालिस्ट खेळाडूंची संघबांधणी केली पाहिजे. टी-20 मालिकेत व्हाइटवॉश देण्याची संधी तर आपण गमावली पण भविष्यकालीन तरतूद करायला काय हरकत आहे.