नवी दिल्ली – यंदाचा इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. सध्या आयपीएलमध्ये आठ संघ सहभागी असून त्यात आणखी दोन संघाची भर पडणार आहे. आयपीएलच्या 2022 च्या मोसमापासून दोन नवे संघ घेण्याचा निर्णय यापूर्वीच बीसीसीआयने घेतला आहे.
नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १७ ऑक्टोबर रोजी दोन नव्या संघांसाठी ऑनलाईन पद्धतीने लिलाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन संघांसाठी अनेक शहरे उत्सुक असून, यातील लखनौ शहरासाठी आरपीएसजी समूहाचे संजीव गोएंका उत्सुक आहेत.
यापूर्वी या समूहाने 2016 आणि 2017 च्या मोसमात पुणे फ्रॅंचाईजीची मालकी घेतली होती. या दोन नव्या संघांसाठी निविदा कागदपत्रे खरेदीसाठी 21 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. दोन नव्या संघासाठी होणारा लिलाव टी 20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर होणार आहे.
या दोन संघांसाठी अहमदाबाद, रांची, लखनौसह इतरही काही शहरे उत्सुक आहेत. .गोएंका यांनी लिलावासाठी आवश्यक असणारी आयटीटी कागदपत्रे मागावून घेतली असून, लखनौ संघ खरेदी करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. दोन नव्या संघांबरोबर बीसीसीआय खेळाडूंच्या लिलावाची देखिल तयारी करत आहे. या वेळी लिलाव भव्य स्तरावर होणार आहे. त्यामुळे सर्व 10 संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी समान संधी मिळणार आहे.