मुंबई: शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याचा जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कारागृहात करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने जामीन मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्यासमोर आज सुनावणी झाली. न्या. जगदाळे म्हणाले, निःसंशयपणे आर्थर रोड कारागृहातील काही कैद्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु सध्या परिस्थिती चांगली आहे.
आतापर्यंत कारागृहातील आढळलेल्या 181 करोनाबाधित कैद्यांपैकी 151 रुग्ण बरे झाले आहेत आणि केवळ 30 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती कारागृह निरीक्षकांनी न्यायालयात दिली.
आर्थर रोड कारागृहात झालेल्या संसर्गामुळे कुणाचा मृत्यू झाला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संजीव खन्ना यांची करोना चाचणी घेतली असता अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. या युक्तीवादानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.