सट्टेबाजांचा बिग फिश संजीव चावलाला अटक

दिल्ली पोलिसांनी भारतात आणले
अनेकांचे खरे चेहरे समोर येणार
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटमध्ये लवकरच एक त्सुनामी येणार आहे. दिल्ली पोलिसांनी जागतिक क्रिकेटमधील सट्टेबाजीचा सर्वात मोठा मासा समजला जाणाऱ्या संजीव चावला या सट्टेबाजाला ताब्यात घेतले आहे. लंडन येथून त्याला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. त्यावेळी त्याच्याकडून काही मोठे खुलासे होणार असल्याचे व्यक्त होत आहे. त्याचवेळी अनेकांचे खरे चेहरे समोर येणार आहेत.

दिल्ली पोलिसांनी जवळपास 19 वर्षांनंतर जागतिक क्रिकेटमधील या सर्वात मोठ्या सट्टेबाजाला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली होती, त्यात त्यांना यश मिळाले आहे. चावलाच्या प्रत्यार्पणासाठी दिल्ली पोलिसांनी अनेकदा लंडन वाऱ्या केल्या होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व चावलाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. डीसीपी (गुन्हे) जी राम गोपाल नाईक यांच्या पथकाने स्कॉटलंड यार्डकडून चावलाला ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉटलंड यार्डकडून सट्टेबाज चावला 19 वर्षांपासून मोस्ट वॉटेड होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावर त्याचा ताबा भारतीय पोलिसांनी घेतला. सुरक्षेच्या कारणामुळे चावला याला कोणत्या विमानाने आणि नेमके किती वाजता भारतात आणले जाणार आहे, याचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला होता.

मॅच फिकिंसगचा म्होरक्‍या
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने 2000 साली केलेल्या मॅचफिक्‍सिंगमध्ये चावला हा एक प्रमुख आरोपी होता. त्याला परदेशात पळून गेल्याने गेली कित्येक वर्षे पोलिसांनी जंगजंग पछाडले होते, अखेर आता त्याला भारतात आणले गेले असून त्याच्या चौकशीत या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जाणार आहेत. पडद्यामागचे खरे गुन्हेगार तसेच काहींचे खरे चेहरे समोर येणार आहेत. चावलाने 1996 मध्ये ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले होते. क्रोनिएने जेव्हा मॅचफिक्‍सिंग केल्याचे कबूल केले होते, त्यावेळी अटकेच्या भीतीने चावला परदेशात पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू होता. मात्र, एका विमान अपघातात क्रोनिएचा मृत्यू झाल्याने सगळी चौकशी चावलापाशीच येऊन थांबायची. आज त्याला अटक झाल्याने या प्रकरणातील सत्य आता समोर येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.