लखनौ : आपचे नेते संजय सिंह यांनी सुनावणीला हजर राहणे टाळल्याबद्दल उत्तरप्रदेशातील सुलतानपूर न्यायालयाने मंगळवारी तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच, सिंह यांना अटक करून २८ ऑगस्टला हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यामुळे राज्यसभेचे खासदार असणाऱ्या सिंह यांच्या २३ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
विस्कळीत वीज पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी सिंह, समाजवादी पक्षाचे नेते अनुप संडा आणि इतर काही जणांनी १९ जून २००१ यादिवशी सुलतानपूरमध्ये निदर्शने केली. त्यावेळी त्यांच्या विरोधात रस्ता रोखल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी सिंह, संडा यांच्यासह ६ जणांना कनिष्ठ न्यायालयाने २०२३ यावर्षीच्या प्रारंभी दोषी ठरवले. त्यांना ३ महिने तुरूंगवास ठोठावण्यात आला.
त्या प्रकरणी सिंह आणि इतरांना न्यायालयाने ९ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले. मात्र, हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात १३ ऑगस्टला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्या प्रकरणाची सुनावणी आज घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सिंह आणि इतर पुन्हा गैरहजर राहिल्याने त्यांच्या अटकेचा आदेश न्यायालयाने जारी केला.