Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महायुतीत खलबतं सुरू असताना, शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, या सर्व चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra Politics) शिरसाट म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. 17 पैकी किती जागा कोणाला मिळणार, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून सात जागांची मागणी असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीनेही काही जागांवर दावा केला आहे. मात्र या सर्व चर्चेचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत होईल.” (Maharashtra Politics) दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “एकनाथ शिंदे हे विधान परिषद जागावाटपासाठी दिल्लीला गेले आहेत, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. ते त्यांच्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामांसाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या आठवड्यातही ते दिल्लीला गेले होते.” (Maharashtra Politics) दरम्यान, महायुतीतील जागावाटपावरून विविध स्तरावर चर्चा सुरू आहेत. ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि जालना या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, “सर्व जागा महायुतीतूनच लढवल्या जातील आणि वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील,” असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics) यावेळी शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “रोहित पवार प्रत्येक पक्षाचं भविष्य सांगत फिरत आहेत. आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा. शिवसेनेचा एकही आमदार कुठे जाणार नाही. आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम आहोत,” असे ते म्हणाले. (Maharashtra Politics) तसेच, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चांवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “निधी वाटपाचा संपूर्ण रेकॉर्ड कलेक्टर कार्यालयात असतो. निधी काही गुपचूप दिला जात नाही. कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी थेट माझ्याशी चर्चा करावी, मी त्यांना स्पष्टीकरण देऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)