कोलकाता : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली होती. त्याचा आता रिपोर्ट समोर आला आहे. यात त्याने बलात्कार आणि हत्येआधी काय काय केलं, त्याची माहिती समोर आली आहे. संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्टवेळी आपला गुन्हा मान्य केला असून त्यावेळी काय घडले ते सगळे सांगितले आहे.
पॉलीग्राफ टेस्टमध्ये काय झाला खुलासा?
त्या रात्री संजय रॉय मित्रासोबत मित्राच्या भावाबद्दल माहिती घेण्यासाठी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला होता. त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल केलं होतं. रात्री सव्वा अकरा वाजता रॉय आणि त्याचा मित्र रुग्णालयातून निघाले. दारु पिण्यासाठी ते गेले आणि रस्त्याच्या कडेलाच प्यायला बसले.
दारु प्यायल्यानंतर संजय रॉय आणि त्याचा मित्र कोलकात्यातील रेड लाइट एरिया सोनागाछी इथं गेले. तिथून ते दक्षिण कोलकात्यातील दुसरा रेड लाइट एरिया असलेल्या चेतला इथं गेले. चेतला भागात जाताना दोघांनी एका मुलीची छेडही काढली होती. चेतलामध्ये संजय रॉयचा मित्र एका महिलेसोबत गेला. तेव्हा संजय रॉय बाहेरच गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत राहिला. यावेळी त्याने गर्लफ्रेंडकडे न्यूड फोटोही मागितले होते.
संजय रॉय आणि त्याचा मित्र तिथून पुन्हा आरजी कर मेडिकल कॉलेजला परतले. रॉय या ठिकाणी चौथ्या मजल्यावर ट्रॉमा सेंटरला गेला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, रॉय तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलच्या कॉरिडोरमध्ये जात आहे. रॉय सेमिनार हॉलमध्ये जिथं पीडिता झोपली होती तिथे गेला. तिथे पीडितेचा गळा दाबला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
आरोपी संजय रॉय यानंतर कोलकाता पोलीस अधिकारी असलेल्या अनुपम दत्ता यांच्या घरी जाऊन झोपला.दुसऱ्या दिवशी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. महिला डॉक्टरच्या शेजारी एक ब्लुटूथ डिव्हाइस आढळलं होतं, त्यावरून संजय रॉयला अटक करण्यात आली होती.